पनवेल, दि. 3(वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलप, साईनगर परिसरातून १२ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती किरणदेवी पिंटू वर्मा (वय ३५, व्यवसाय मजुरी) या साईनगर, वलप, पो. पडघे, ता. पनवेल येथे राहतात. त्या बाथरूमसाठी गेल्या असताना आणि त्यांचे दीर अजयकुमार किराणा दुकानात गेले असताना त्यांचा मुलगा कु. युवराज पिंटू वर्मा (वय १२ वर्षे ८ महिने) याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
युवराजचे वर्णन सावळा वर्ण, सडपातळ बांधा, उंची सुमारे ४ फूट, काळे केस व काळे डोळे असे असून, तो लाल रंगाचा टी-शर्ट आणि हिरव्या रंगाची हाफ चड्डी परिधान करून घराबाहेर पडला आहे. त्याच्याकडे सायकलही असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच मुलाचा शोध सुरु करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित मुलगा यापूर्वीही सुमारे पाच-सहा महिन्यांपूर्वी तसेच दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता आणि त्यानंतर स्वतःहून घरी परतला होता, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी करत असून, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

