4kNews कामोठे दि. 10
पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गमित्र – पनवेल यांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, नवख्या पर्यटकांसाठी धोक्याची घंटा.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंती करण्याचा मोह अनेकांना असतो. मात्र, डोंगर-दऱ्यांचा अनुभव नसताना, स्थानिक मार्गदर्शकांची मदत न घेता आणि योग्य नियोजनाशिवाय केलेली भटकंती कधी जीवघेणी ठरू शकते, याची प्रचिती माची प्रबळगड परिसरात आज घडलेल्या घटनेतून आली.

माची प्रबळगडावर चढण्यासाठी निघालेले दोन 17 वर्षीय पर्यटक रस्ता चुकल्याने डोंगराच्या परिसरात अडकले. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती 112 क्रमांकावर देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस हवालदार अमर भालसिंग आणि प्रदीप पोपटे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे आणि वसेकर यांच्या पुढाकाराने बचाव कार्याला वेग देण्यात आला.

या मोहिमेत माची प्रबळ गावातील स्थानिक रहिवासी नवनाथ पारधी आणि हरिश्चंद्र पारधी, पोलीस अंमलदार तसेच निसर्ग मित्र संस्था – पनवेल आणि हेल्प फाउंडेशन यांच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. स्थानिकांना डोंगरातील वाटा आणि परिसराची माहिती असल्याने बचाव पथकाने योग्य दिशेने शोधमोहीम राबवत दोन्ही मुलांना शोधून काढले. अखेर त्यांना सुखरूपपणे डोंगरावरून खाली आणण्यात यश आले.
स्वतःचा जीव धोक्यात घातलेल्या दोन्ही मुलांची नावे गौरी गणेश चंदनशिवे (वय 17, रा. अविवा बिल्डिंग, मीरा रोड, ठाणे) आणि उत्कर्ष बिपीन सिंग (वय 17, रा. आर्यन सिटी, कल्याण रोड, ठाणे) अशी आहेत. दोघांनाही त्यांचे नातेवाईक प्रतीक्षा सतीश चंदनशिवे यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.

*नवख्या पर्यटकांनी ‘रोमांच’ आणि ‘धोका’ यातील फरक ओळखण्याची गरज.*
माची प्रबळगड, प्रबळगड आणि सह्याद्रीचा परिसर निसर्गसौंदर्याने समृद्ध असला, तरी हा परिसर तितकाच आव्हानात्मक आणि काही ठिकाणी धोकादायक आहे. पावसाळ्यात तर धुकं, घसरडे कडे, निसरड्या वाटा, पाण्याचे प्रवाह आणि बदलणारे हवामान यामुळे धोका अनेक पटींनी वाढतो.
आज सोशल मीडियावरील व्हिडिओ, रील्स आणि फोटो पाहून अनेक नवखे पर्यटक अशा ठिकाणी जाण्याचे नियोजन करतात. मात्र, डोंगराचा पूर्वानुभव नसताना, मार्गाची माहिती नसताना आणि स्थानिक गावकऱ्यांची किंवा अनुभवी मार्गदर्शकांची मदत न घेता केलेले धाडस कधीही अडचणीत आणू शकते.

एखादी वाट चुकली, मोबाईलला नेटवर्क मिळाले नाही किंवा अंधार पडला, तर काही मिनिटांचा रोमांच अनेक तासांच्या जीवघेण्या संघर्षात बदलू शकतो. अशा घटनांमध्ये अनेकदा स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, बचाव पथके आणि स्वयंसेवी संस्था स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांच्या मदतीला धावून येतात. मात्र प्रत्येक वेळी मदत वेळेत मिळेलच असे नाही..

*’डोंगर जिंकायचा नसतो; डोंगर समजून घ्यायचा असतो!’*
पर्यटकांनी सह्याद्रीत भटकंती करताना केवळ साहसाचा विचार न करता सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे. स्थानिक ग्रामस्थांकडून मार्गाची माहिती घ्यावी, शक्य असल्यास अनुभवी स्थानिक मार्गदर्शक सोबत घ्यावा, हवामानाचा अंदाज तपासावा, आवश्यक साहित्य बाळगावे आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालू नये.

*एका चुकीच्या पावलाची किंमत कधी कधी आयुष्यभराची असू शकते.*
माची प्रबळगडावरील या घटनेत पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्थांच्या तत्परतेमुळे दोन तरुणांचा जीव वाचला. मात्र ही घटना भविष्यातील पर्यटकांसाठी एक स्पष्ट संदेश देऊन जाते तो म्हणजे “सह्याद्री सुंदर आहे, पण त्याला कमी लेखू नका. साहस करा, मात्र बेफिकीर धाडस करू नका.स्थानिकांचा सल्ला घ्या, सुरक्षिततेची काळजी घ्या आणि मगच निसर्गाच्या सान्निध्यात पाऊल ठेवा.”

