4kNews कामोठे दि. 8
पनवेल प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि पनवेल परिसरातील सर्व रोटरी क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ (व्यावसायिक उत्कृष्ट पुरस्कार) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार भारताचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड यांचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.भारतीय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कार विजेते म्हणून दिनेश लाड याना भारत सरकारने गौरव केला आहे.

आपल्या व्यवसायात उच्च नैतिक मूल्ये जपणे, उत्कृष्ट कामगिरी करणे आणि दैनंदिन कामाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी रोटरी क्लबतर्फे दरवर्षी हा ‘व्होकेशनल अवॉर्ड’ दिला जातो.
रोटरी क्लबच्या ‘फोर-वे टेस्ट’नुसार व्यवसाय आणि नोकरीमध्ये उच्च नैतिक मूल्यांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे, समाजात उत्कृष्टतेचा सन्मान करणे आणि व्यावसायिक जीवनासोबतच समाजसेवेची सांगड घालणाऱ्या आदर्शांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष प्रसाद दीक्षित आणि सचिव राजेन्द्र कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नितीन ढमाले उपस्थित राहणार आहेत
पनवेल परिसरातील इतर सर्व रोटरी क्लब्स या सोहळ्याचे सह-आयोजक आहेत. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, जुने पनवेल येथे बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता हा कार्यक्रम होणार असून
या सोहळ्यास सर्व नागरिकांनी व रोटरी सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पनवेल मीड टाऊन चे अध्यक्ष प्रशांत माने आणि आयोजकांकडून करण्यात आले आहे.

