4kNews कामोठे दि. 19
पनवेल/नवी मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, ध्वज पथकाची दिमाखदार उपस्थिती आणि पारंपरिक वेशभूषेतील एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे विमानतळ परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.

गणरायाच्या आगमनानिमित्त विमानतळावर भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात ध्वज पथक, लेझीम पथक, अब्दागिरी आणि ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते.

यावेळी ‘द फोक मराठी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. गणपतीवरील भक्तिगीते, कोकणातील कलाकारांनी सादर केलेले पारंपरिक बाळ्या नृत्य, तसेच विविध लोकसंगीत व लोकनृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रवाशांसह विमानतळावरील कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विमानतळ परिसराला काही काळ महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि परंपरेचा उत्सवी रंग चढला होता.

