4kNews कामोठे दि. 6
पनवेल (प्रतिनिधी) : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. पात्र केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याबरोबरच विनाचौकशी बंद करण्यात आलेली पात्र रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन २ नोव्हेंबर २०२६ रोजी पनवेल तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. तांदूळ, गहू, साखर, खाद्यतेल आणि डाळ या पाच जीवनावश्यक वस्तू रास्त भाव धान्य दुकानांमार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच बंद करण्यात आलेल्या रेशनकार्डांची पारदर्शक पुनर्तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची कार्डे तातडीने सुरू करावीत, धान्याचा नियमित साठा उपलब्ध ठेवावा आणि राज्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना महागाईतून दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील आणि भरत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन सादर करताना नगरसेवक नितीन गावंड, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, बबन फडके, शांताराम कुंभारकर, दत्ता फडके, शशिकांत भगत, जयंत पाखरे, संदीप घोगरे, आत्माराम लहाने यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

