4kNews कामोठे
पनवेल, दि. 6 (वार्ताहर) : तळोजा फेज १, फेज २ आणि खारघर परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महिला विंगने सिडको प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. रायगड भवन येथे सिडकोच्या जलविभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन महिलांनी अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नाराजी व्यक्त केली. सात दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

या बैठकीला सिडकोचे अधीक्षक अभियंता नानिक चोतानी आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता चेतन बुध उपस्थित होते. परिसरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असून, प्रशासनाकडून १५ ते ३० टक्के पाणी कपात सांगितली जात असली तरी नागरिकांना प्रत्यक्षात ५० टक्क्यांहून अधिक टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शुक्रवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय बदलून शटडाऊन अन्य दिवशी घेण्याची मागणी करण्यात आली. यावर शुक्रवारचा शटडाऊन अन्य दिवशी हलविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

येत्या सात दिवसांत पाण्याचा दाब आणि पुरवठ्यात सुधारणा करण्यासह रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले. मार्च २०२७ पर्यंत तळोजा परिसर टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास रास्ता रोको आणि सिडको कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा महिला विंगने दिला.

या वेळी रायगड जिल्हा महिला विंगच्या अध्यक्ष कुलसुम मस्तान शेख, विद्यार्थी विंगच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष झिमत पोते, तळोजा प्रभाग महिला विंगच्या अध्यक्षा शमा खान, उपाध्यक्षा हसीना बेगम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

