4kNews कामोठे दि. 6
न्यू पनवेल (प्रतिनिधी) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) फॅशन अँड अपेरल डिझाईन आणि इंटीरियर डिझाईन विभागांतर्फे ४ नोव्हेंबर रोजी ‘दिवाळी बाजार’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, विज्ञान विभागाचे प्रभारी प्राध्यापक व आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. बी. डी. आघाव आणि वाणिज्य विभागाचे प्रभारी प्राध्यापक प्रा. एस. बी. यादव यांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या हस्तनिर्मित अॅक्सेसरीज, सजावटीच्या वस्तू, पणत्या, दिवाळी साहित्य आणि विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. आकर्षक मांडणी आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक स्टॉल्सवरील वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला.

हा उपक्रम विभाग समन्वयक प्रा. दीपश्री राठोड आणि प्रा. प्रज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, सांघिक कार्य आणि उद्योजकीय कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने नमूद केले.

