पनवेल(प्रतिनिधी); तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त खांदा कॉलनी येथे परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने बुद्धभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता जाहीर व्याख्यान व प्रबोधनात्मक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक महादेव वाघमारे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये होणार आहे. तर लय बळ आलया, माझ्या दुबळ्या पोरात.. फेम सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांच्या प्रबोधनात्मक गीत गायनांचा भव्य कार्यक्रम सायंकाळी सात ते दहा या वेळेत संपन्न होणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी खांदा कॉलनीतील जास्तीत जास्त नागरिकांनी सेक्टर 9, सिडको गार्डनच्या बाजूला येथे उपस्थित राहावे असे आवाहन महादेव वाघमारे यांनी केले आहे.
