पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल जवळील टी पॉईंटच्या ओव्हर ब्रीजवर पळस्पेकडॅन् मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ट्रेलर क्र.एमएच-01-ईएम-4917 वरील चालक जावेद अली साजात अली (40) याने रस्त्याच्या डाव्या बाजूला हयगयीने अविचाराने सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत ट्रेलर उभा करून ठेवला असताना पाठीमागून आलेल्या डंपर नं.एमएच-47-बीवाय-1649 वरील चालक महेश महातो याची धडक सदर ट्रेलरला बसल्याने या अपघातात चालक महेश महातो हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

परंतु उभ्या ट्रेलरच्या आतमध्ये डंपर घुसल्याने चालक महेश महातो हा अडकला होता व तो गंभीररित्या जखमी झाला होता. तेथील पोलिसांनी त्वरित पनवेल अग्नीशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले व अथक प्रयत्नाने महेश महातोला बाहेर काढून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
