4kNews कामोठे
उरण (विठ्ठल ममताबादे) दि. ६ : महिनाभरात गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून उरण तालुक्यातील चार गुंतवणूकदारांची ७२ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोप्रोली येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिलेने पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये एका गुंतवणूकदाराची भेट घेऊन महिनाभरात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे, तसेच मूळ रक्कम सुरक्षित राहण्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून करंजा परिसरातील एका ३१ वर्षीय व्यक्तीने ८ सप्टेंबर रोजी चार लाख रुपये आणि दुसऱ्या दिवशी ९८ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर आणखी तीन व्यक्तींनीही या योजनेत पैसे गुंतवले. अशा प्रकारे चौघांकडून एकूण ७२.९८ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.

मात्र, ठरलेली मुदत संपल्यानंतरही दुप्पट रक्कम किंवा मूळ गुंतवणूक परत मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली. नवी मुंबई पोलीस दलाच्या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाने प्राथमिक चौकशी केल्यानंतर संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, उरण-पनवेल परिसरात यापूर्वीही दामदुप्पट गुंतवणूक योजनांच्या आमिषाने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत योजनांपासून सावध राहावे आणि गुंतवणुकीपूर्वी संबंधित योजनेची कायदेशीर वैधता तपासावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

