4kNews कामोठे
रानसई मार्गाचीवाडी व सागाचीवाडी येथे जीवनावश्यक वस्तू आणि पणत्यांचे वाटप
उरण, दि. 5 (विठ्ठल ममताबादे) : दिवंगत अखिला यांच्या स्मृती जपत अखिला मेमोरियल ट्रस्टच्या वतीने उरण तालुक्यातील रानसई मार्गाचीवाडी आणि सागाचीवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये रवा, मैदा, साखर, गोडेतेल, बेसन तसेच दीपोत्सवासाठी सुंदर पणत्यांचा समावेश होता.

अल्पवयात कर्करोगामुळे मुलगी अखिला हिला गमावल्यानंतर तिच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी बाळा सुब्रमण्यम आणि कलावती सुब्रमण्यम यांनी अखिला मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना, विशेषतः कर्करोगग्रस्तांना मदत करण्याबरोबरच आदिवासी बांधवांना अन्नधान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य आणि औषधांचे वाटप केले जाते.

या उपक्रमासाठी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि संपेश पाटील यांनी विशेष सहकार्य केले. दिवाळी भेट मिळाल्याने आदिवासी महिला, भगिनी आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

या कार्यक्रमाला अखिला मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक बाळा सुब्रमण्यम, कलावती सुब्रमण्यम, राजू मुंबईकर, नारायण माने, रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच राधाताई पारधी, विलास ठाकूर, सुरेंद्र पाटील, अनिल घरत, संपेश पाटील, शाम लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. रानसई प्राथमिक शाळेजवळील समाजमंदिरात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

