4kNews कामोठे
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती; सामाजिक व विकासकामांतील योगदानाचा गौरव
उरण, दि. 5 (विठ्ठल ममताबादे) : उरण बायपास रस्त्याच्या निर्मितीसाठी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा आणि संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उरण बायपास रोड, कोटनाका येथे उत्साहात पार पडला. उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी गोपाळराव पाटील यांनी बायपास रस्त्याच्या संघर्षाचा इतिहास सांगितला. २००८ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे आणि सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष नकुल पाटील यांच्याकडे लेखी मागणी करून पाठपुरावा सुरू केला. २०१० मध्ये सिडकोकडून सुमारे २८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर झाली; मात्र काम रखडले. २०१६ मध्ये उपोषण आणि निवेदनांच्या माध्यमातून पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. २०१८ मध्ये कामाची किंमत ४२ ते ४५ कोटी रुपये निश्चित झाली. अखेर २०२६ मध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळून बायपास पुलाचे काम पूर्ण झाले.

या कामाचे श्रेय मंत्री सुनील तटकरे, सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष नकुल पाटील, अध्यक्ष प्रमोद हिंदुराव तसेच सातत्याने हा प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना असल्याचे गोपाळ पाटील यांनी नमूद केले. सार्वजनिक विकासकामांसाठी चांगले प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या सोहळ्याला अॅड. विजय पाटील, रेश्मा पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, संतोष पवार, संदीप पाटील, सुधाकर पाटील, दा. चा. कडू, एल. बी. पाटील, कामगार नेते रवी घरत, नगरसेविका प्रमिला पवार, माजी सरपंच मानसी पाटील, हेमलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी गोपाळराव पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन उरण सामाजिक संस्था, आधार सावली फाउंडेशन, उरण उत्कर्ष समिती, युवा सामाजिक संस्था व जासखार आणि उरण तालुका चेस असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले.

