काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निर्दोष पर्यटकांना प्राण गमवावे लागले. त्या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. भारतीय सेनेने धाडसी कारवाया करून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या जखमा आजही ताज्याच आहेत. शहिदांच्या बलिदानाची सावली अजूनही जनमानसावर आहे.

अशा वेळी भारत–पाक क्रिकेट सामना खेळवण्यास परवानगी देणे हे भारतीयांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे आहे. सरकारने या सामन्यास परवानगी दिली आहे, ही भूमिका थेटपणे प्रश्नांकित करावी लागेल. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या बलिदानानंतरही, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अशा सामन्यांना हिरवा कंदील दाखवला जातो, हे अतिशय दुर्दैवी आहे.
या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांची भूमिका विशेषतः संतापजनक आहे. पैसा, प्रायोजक आणि व्यापारी व्यवहार यांच्या मोहात अडकलेल्या या संस्थेला देशाच्या जखमा दिसत नाहीत, देशभक्तीची जाणीव होत नाही. क्रिकेट हे केवळ खेळ राहिलेले नाही; ते आता एक उद्योग झाले आहे. आणि या उद्योगासाठी देशाच्या आत्मसन्मानावर गदा येत असेल, तरी त्यांना त्याचे काहीच वाटत नाही, असेच दिसते.

तितकाच निषेध या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या काही चाहत्यांचाही करावा लागेल. प्रश्न सरळ आहे – देशाच्या जखमा मोठ्या की खेळाचा मोह? पहलगामसारख्या हल्ल्यात निर्दोषांचे प्राण घेतले जातात, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होतात, आणि आपण त्याच देशाशी सामना खेळण्यास उत्सुक असतो? ही वृत्ती नक्कीच राष्ट्रभक्तीची नाही.
आजचा सामना हा फक्त बॅट–बॉलचा खेळ नाही. तो भारतीय जनतेच्या आत्मसन्मानाशी निगडित प्रश्न आहे. शहिदांच्या बलिदानाला आणि पीडितांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी या सामन्याचा तीव्र निषेध होणे आवश्यक आहे.

हा सामना बहिष्कृत करावा, सरकारकडे उत्तर मागावे आणि BCCI ला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. . “पैशाच्या मोहापेक्षा देशभक्तीला प्राधान्य दिलं नाही, तर राष्ट्राच्या जखमांवर वारंवार मीठ चोळलं जाईल.”
© संपादक : गौरव जहागीरदार
www.4ksamachar.com
14/9/2025