पनवेल, दि.1 4k समाचार संजय कदम (वार्ताहर) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात पादचारी इसमावर वस्तार्याने वार करून जखमी करणार्या व रोख रक्कम व मोबाईल फोन लंपास करणार्या एका तडीपार गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

मुकेश छेडा हे पनवेल, नाडकर्णी हॉस्पिटल जवळ राहत असून ते पनवेल रेल्वे स्टेशन येथे उतरून घरी जाण्यासाठी निघाले. ते एसटी डेपो कडे जाणार्या रस्त्याने पायी चालत जात असताना एक अनोळखी इसम यांच्या जवळ आला आणि गांजा आहे का असे विचारण्याचा बहाने केला आणि त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेतला. त्याला प्रतिकार करत असताना अनोळखी इसमाने वस्तारा काढला आणि त्यांच्या शरीरावर वार करून त्यांना जखमी केले आणि तो झोपडपट्टीमध्ये पळून गेला.

याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी एजाज सलीम शेख (25) याचा शोध पोउनि.हजरत पठाण, पो.हवा.कुडावकर, पोना पारधी, मेथे, पोशि मोकल, काकडे आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे पनवेल परिसरातून ताब्यात घेतले असता सदर आरोपीला रायगड व ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही तो पनवेलमध्ये येवून त्याने हा गुन्हा केल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
