4kNews कामोठे दि. 5
दुकानदारांच्या मागण्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार; महागाईतून दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी – भरत पाटील
पनवेल (प्रतिनिधी) : रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन, पनवेलच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनी, सेक्टर ९ येथील शिवसेना शाखेत अध्यक्ष भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पनवेल तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या विविध समस्या, प्रलंबित मागण्या आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

दुकानदारांच्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी शासनदरबारी मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचे ठरले.

यावेळी भरत पाटील यांनी दुकानदारांच्या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, असे सांगितले. दुकानदारांच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघटना एकजुटीने लढा देत सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बैठकीत संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

