4kNews कामोठे
उरण, दि. 6 (विठ्ठल ममताबादे) : द्रोणागिरी-पागोटे येथील डी.आर.टी.ए. सीएफएस, कॉनकोर येथे कार्यरत असलेल्या १११ कामगारांचे चार महिन्यांचे वेतन थकविण्यात आल्याने कामगारांनी ५ नोव्हेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. रायगड श्रमिक संघटनेच्या माध्यमातून आणि कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मे. सॅम सर्वेअर्स अँड अॅडजस्टर्स या कंत्राटदार कंपनीमार्फत लेबर, सुपरवायझर आणि सर्वेअर पदांवर हे कामगार कार्यरत आहेत. जून ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांचे वेतन बेकायदेशीररीत्या कपात केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वारंवार चर्चा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
थकीत वेतन तातडीने अदा करणे, वेतनपत्रके देणे, पीएफ, ईएसआयसी, बोनस व ओव्हरटाईमचे लाभ मिळवून देणे, रजेचे पैसे अदा करणे, कामगारांना कामावरून कमी न करणे, प्रलंबित वैद्यकीय बिले देणे तसेच कामगारांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय कामगारांच्या वेतनाबाबत नियमितता आणि व्यवस्थापनाकडून लेखी हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामगार नेते भूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड. भार्गव पाटील, भाजपचे माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील, उरण तालुका भाजप उपाध्यक्ष विजय पाटील, सरपंच कुणाल पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष आशिष तांडेल, माजी अध्यक्ष प्रकाश भोईर, सेक्रेटरी रमेश पाटील, कामगार नेते अरुण पाटील व विनोद पाटील, रायगड श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्राणनाथ पाटील, उपाध्यक्ष भूमित भगत, सेक्रेटरी मितेश पाटील, खजिनदार जगदीश तांडेल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला सफाई कामगार आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन थकीत वेतन व इतर कायदेशीर लाभ अदा करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही रायगड श्रमिक संघटनेने प्रशासनाला दिला आहे.

