4kNews कामोठे दि. 6
नवी मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीचा उत्साह, खरेदीची संधी, खाद्यपदार्थांची मेजवानी आणि संगीताची सुरेल मैफल अशा वातावरणात माईंडस्पेस फ्युजनतर्फे ऐरोली पूर्व येथील परिसरात दोन दिवसीय ‘फेस्टिव्ह बाजार’चे आयोजन करण्यात आले. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या या उपक्रमाला दोन दिवसांत ५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. यामध्ये ३ हजार ५०० हून अधिक कर्मचारी आणि भाडेकरूंचा सहभाग होता.

या बाजारात फॅशन, खाद्यपदार्थ, अॅक्सेसरीज आणि पारंपरिक मिठाई अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे २० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. ऐरोली व नवी मुंबईतील स्थानिक उद्योजक आणि घरगुती व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

हस्तकला व चित्रकला कार्यशाळा, व्यक्तिचित्र रेखाटन आणि ‘द पीपल्स दिवाळी वॉल’ या उपक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच ‘बांदेया’ आणि ‘सोल सॅलड’ या बँडच्या संगीत सादरीकरणासह डीजे रोव्ह आणि डीजे द किड मंकी यांच्या कार्यक्रमांनी महोत्सवात विशेष रंगत आणली. स्थानिक नागरिक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा फेस्टिव्ह बाजार उत्साहात पार पडला.

