4kNews कामोठे
पनवेल, दि. ६ (संजय कदम) : दिवाळीचा सण आनंदात साजरा करताना नागरिकांनी घराच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी केले आहे.

दिवाळीनिमित्त अनेक नागरिक बाहेरगावी जात असल्याने बंद घरांमध्ये चोरी व घरफोडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे घराचे दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि घर बंद असल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करू नये. शेजारी किंवा नातेवाइकांना घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी.

बाजारपेठांमधील गर्दीत दागिने, मोबाईल आणि पाकिटांची काळजी घ्यावी. तसेच ऑनलाइन खरेदीच्या आकर्षक जाहिराती व सवलतींच्या आमिषाला बळी पडू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, ओटीपी किंवा बँक खात्याची माहिती अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वाहने आढळल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे आणि सुरक्षित वातावरणात दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ज्योती देशमुख यांनी केले आहे.

