4kNews कामोठे
SIR प्रक्रिया रद्द करण्याची आमदार रईस शेख यांची मागणी; ५४० नावांवरील आक्षेपांची चौकशी करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 23ऑक्टोबर (प्रतिनिधी) : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत सुमारे १२ हजार मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. ही प्रक्रिया रद्द करून मतदार यादीतील कथित अनियमिततांची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या दाव्यानुसार, ११ ऑक्टोबरपर्यंत भिवंडी पूर्व मतदारसंघातील ५४० मतदारांच्या नावांवर फॉर्म-७ द्वारे आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ५०० आक्षेप मुस्लिम मतदारांच्या नावांविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. या आक्षेपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
शेख यांच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये या मतदारसंघात सुमारे २.६९ लाख मतदार होते. त्यानंतर ही संख्या वाढून ३.७६ लाखांपर्यंत पोहोचली; मात्र, सध्याच्या प्रक्रियेनंतर मतदार यादीत केवळ १.९१ लाख मतदारांची नावे शिल्लक असल्याचा त्यांचा दावा आहे. अनेकांनी एन्युमरेशन फॉर्म भरून दिल्यानंतरही त्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

काही मतदारांना अनुपस्थित किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित दाखविण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली. दुबार नोंदी दूर करताना पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.
सध्याची SIR प्रक्रिया भाजपला अनुकूल असल्याचा आरोप करत शेख यांनी ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. तसेच, भिवंडीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेची चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर तारिक मोमीन, स्थायी समितीच्या अध्यक्ष ईशा इमरान खान आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


