4kNews कामोठे दि. 31
नवी मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणाने त्रस्त असलेल्या ५७ वर्षीय महिलेच्या छातीत हृदयाच्या मागील बाजूस असलेली १८ सेंटीमीटरची थायरॉईडची गाठ नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढली. सुमारे १० तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सात दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

अलिबाग येथील दहिता जैतू यांना गेल्या दोन वर्षांपासून चालताना धाप लागणे आणि अशक्तपणा जाणवत होता. तपासणीदरम्यान त्यांच्या छातीत हृदयाच्या मागे मोठी गाठ असल्याचे सीटी स्कॅनमध्ये स्पष्ट झाले. ही गाठ थायरॉईडच्या अतिरिक्त ऊतींपासून तयार झाली होती. हृदय, श्वासनलिका आणि प्रमुख रक्तवाहिन्यांच्या जवळ गाठ असल्याने शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.

कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. राहुलकुमार एन. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ज्ञ डॉ. विदिशा, परिचारिका संदीप दिसले, अतिदक्षता विभागातील डॉक्टर आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. गाठ सुरक्षितपणे काढण्यासाठी मानेवर छेद देण्यासोबतच छातीच्या मध्यभागातील हाड उघडून शस्त्रक्रिया करावी लागली. रक्तवाहिन्या, श्वासनलिका आणि मज्जातंतूंना इजा होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली.

डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, गाठीचा आकार आणि तिचे हृदय व प्रमुख रक्तवाहिन्यांजवळील स्थान यामुळे शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. मात्र, नियोजनबद्ध पद्धतीने गाठ पूर्णपणे काढण्यात यश आले. शस्त्रक्रियेनंतर रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होणे किंवा स्वरयंत्राशी संबंधित नसांना इजा होणे, अशी गुंतागुंत आढळली नाही.
उपचारानंतर समाधान व्यक्त करताना दहिता जैतू यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रुग्णालयाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल आणि सेंटर हेड संदीप जोशी यांनीही या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले..

