4kNews कामोठे
जय गुरुदेव कॉम्प्लेक्स परिसरातील महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांची नाराजी; दुर्घटनेपूर्वी दुरुस्तीची मागणी
पनवेल, दि. 31 (वार्ताहर) : कामोठे सेक्टर १७ मधील जय गुरुदेव कॉम्प्लेक्सजवळ तसेच परिसरातील अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत वितरण पेट्या (डीपी) उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डीपीमधील उघड्या वायरींमुळे लहान मुले, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

जय गुरुदेव कॉम्प्लेक्सजवळील डीपी रस्त्याच्या कडेला असून, या मार्गावर नागरिकांची सतत वर्दळ असते. परिसरात इंडो स्कूल असल्याने विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

या समस्येबाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत महापालिकेत झालेल्या बैठकीतही चर्चा झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याची तक्रार आहे. परिसरातील सर्व उघड्या डीपींची तपासणी करून असुरक्षित वायरी बदलणे, मजबूत झाकणे बसवणे आणि सुरक्षित कुलूप लावणे आवश्यक आहे. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

