4kNews कामोठे
उरण, दि. 31(विठ्ठल ममताबादे) : जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलता येते, हे उरणमधील पार्थ आणि आदी निशांत पाटील या सख्ख्या भावांनी सिद्ध केले आहे. एलिफंटा लेणी (घारापुरी) ते नागाव-पिरवाडी बीच असे सुमारे १८ किलोमीटरचे समुद्री अंतर दोघांनी यशस्वीरीत्या पोहून पूर्ण केले. विशेष म्हणजे, डाउन सिंड्रोम असलेल्या १३ वर्षीय पार्थने हे आव्हान पूर्ण करून प्रेरणादायी कामगिरी केली, तर अवघ्या सात वर्षांच्या आदीने हा समुद्री मार्ग पूर्ण करणारा सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा मान मिळवल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजता दोघांनी घारापुरी येथून पोहण्यास सुरुवात केली. पार्थने ६ तास ५७ मिनिटांत, तर आदीने ५ तास ५६ मिनिटांत १८ किलोमीटरचे अंतर पार करून नागाव-पिरवाडी बीच गाठला. पार्थ सीबर्ड स्पेशल स्कूल, उरण येथे, तर आदी सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे.

गेल्या चार वर्षांपासून दोघेही नियमित जलतरणाचा सराव करीत आहेत. सी-स्विमिंग प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू संतोष पाटील आणि स्विमिंग प्रशिक्षक विजय बेहेरा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत निरीक्षक म्हणून सुनील मयेकर आणि नील लब्दे यांनी जबाबदारी सांभाळली. विंडसर्फिंगमधील सुवर्णपदक विजेते राज पाटील आणि साई पाटील यांचेही सहकार्य लाभले.

डाउन सिंड्रोम असतानाही पार्थने समुद्रातील १८ किलोमीटरचे आव्हान पूर्ण करून विशेष मुलांमधील क्षमता अधोरेखित केली. तर आदीने कमी वयात ही कामगिरी करून जलतरण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या दोघांच्या यशामागे पालक निशांत आणि संपदा पाटील यांचे प्रोत्साहन व पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे.
पार्थ आणि आदी यांच्या या कामगिरीचे उरणसह परिसरातून कौतुक होत असून, भविष्यात जलतरण क्षेत्रात मोठी कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार या दोन्ही भावांनी व्यक्त केला आहे.

