4kNews कामोठे
उरण, दि. 31 (विठ्ठल ममताबादे) : वेतन, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांकडून होणारा कथित अन्याय आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (भारतीय मजदूर संघ) नेतृत्वाखाली २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील २६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले.

महावितरणच्या मुंबईतील प्रकाशगड मुख्य कार्यालयासमोर सकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. यावेळी महावितरणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि कामगार उपआयुक्त चेतन जगताप यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली.
वेतनातून रिफंडच्या नावाखाली पैशांची मागणी करणे किंवा कामावरून कमी करण्याच्या धमक्या देणे, अशा तक्रारी लेखी स्वरूपात मिळाल्यास चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली. पात्र कामगारांना २१ हजार रुपये वेतन, वेतनातील फरक आणि बोनस देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे संघटनेने सांगितले. कामगारांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा करणे, विमा संरक्षण, कंत्राटदार बदलल्यानंतरही अनुभवी कामगारांचा रोजगार कायम ठेवणे आणि हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटी कामगार व्यवस्था लागू करणे, या मागण्यांवरही चर्चा झाली.

या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष निलेश खरात आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले. राहुल बोडके, उमेश आणेराव, सागर पवार यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी सहभागी झाले होते.
चर्चेत काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. निर्धारित मुदतीत लेखी आश्वासन न मिळाल्यास ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निलेश खरात आणि सचिन मेंगाळे यांनी दिला.

