4kNews कामोठे
पनवेल, दि.31 (वार्ताहर) : पनवेलमधील क्रिकेटला पुन्हा चालना देण्यासाठी शहरात आधुनिक क्रिकेट मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील भूखंड क्रमांक ५०८ (पार्ट) आणि ५२० (पार्ट) येथे हे मैदान उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नगरसेवक तथा भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमित उल्हास झुंजारराव यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

एकेकाळी पनवेलमधील सोसायटी, युनिटी, नानू फुलवाद, हरिओम, नवज्योत, स्मॅश, इलेव्हन फायटर आणि मंगलमूर्ती यांसारख्या संघांनी क्रिकेटमध्ये ठसा उमटवला होता. मात्र, वाढते शहरीकरण आणि मैदानांची कमतरता यामुळे स्थानिक खेळाडूंना सरावासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे.

प्रस्तावित मैदानाच्या चारही बाजूंना संरक्षक कुंपण, सात ते आठ संघांना एकाच वेळी सराव करता येतील अशा सराव विकेट्स आणि मध्यभागी दर्जेदार टर्फ विकेट उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे लेदर बॉलवरील सामने आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणेही शक्य होणार आहे.
या मैदानामुळे स्थानिक आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना दर्जेदार सरावाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पनवेलच्या क्रिकेटविश्वाला नवी उभारी मिळण्यास मदत होऊ शकते.

