4kNews कामोठे
‘जे जे रसोई’च्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित; महापौर नितीन पाटील यांचे प्रशासनाला कारवाईचे निर्देश
पनवेल, दि. 31 (वार्ताहर) : गरीब फेरीवाल्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पनवेल महापालिकेकडून बड्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या तथा नगरसेविका लीना गरड यांनी महासभेत उपस्थित केला. खारघर येथील ‘जे जे रसोई’ बार अँड रेस्टॉरंटच्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा मांडत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. याची दखल घेत महापौर नितीन पाटील यांनी संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

महापालिकेकडून गेल्या महिनाभरापासून रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवून हातगाडीधारक व फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. मात्र, खारघरमधील ‘जे जे रसोई’ने सुमारे १५ फूट रुंद पदपथावर लाकडी कुंपण उभारून अतिक्रमण केल्याचा आरोप गरड यांनी केला. यापूर्वी आंदोलनानंतर दोन आमदारांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटविण्यात आले होते; मात्र पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

फेरीवाल्यांवर कठोर कारवाई आणि मोठ्या व्यावसायिकांना वेगळा न्याय, असा दुजाभाव न करता सर्वांवर समान निकष लागू करावेत, अशी मागणी गरड यांनी केली. आता महापालिका प्रशासन या आदेशानुसार प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

