4kNews कामोठे दि. 31
पनवेल, दि. २७ (वार्ताहर) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलन करण्यात आले. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील चौकात झालेल्या या आंदोलनाची सुरुवात महाराजांना अभिवादन करून करण्यात आली.

कथित मतचोरी, जनमताची चोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर काँग्रेसने या आंदोलनातून आवाज उठवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ‘ज्ञानेश कुमार हटाओ, देश बचाओ’ आणि ‘वोट चोर, गद्दी छोड़’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अमित दवे यांनी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाहीचे संरक्षण हे महत्त्वाचे प्रश्न असल्याचे सांगितले. नगरसेवक लतीफ शेख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होत असल्याचे नमूद केले. माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते संघटनात्मक कामासाठी सक्रिय असल्याचे सांगितले. हेमराज म्हात्रे यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली.

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांनी मतदानाचा अधिकार, लोकशाही मूल्ये आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले..

आंदोलनात डॉ. अमित दवे, लतीफ शेख, यशवंत सावळेकर, शशिकांत बांदोडकर, सुदाम पाटील, निर्मला मात्रे, हेमराज म्हात्रे, आदित्य सावळेकर, सुधीर मोरे, शाहिद मुल्ला, विकास भारतीय, राजाभाऊ दवे, सागर पगारे, अमित जगनाडे, आरती ठाकूर, नीता शेनॉय, अलका ठाकूर, चैताली ठाकूर, सुनंदा घरत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

