4kNews कामोठे दि. 31
खारघर (वार्ताहर) : अखिल भारतीय सीबीएसई शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्रासह पनवेलचे नाव उंचावणाऱ्या खारघरच्या सई सुयोग कारंडे हिचा खारघर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

हरियाणातील कैथल येथे १४ ते २० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ५२ ते ५४ किलो वजन गटात सईने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. तिच्या या यशाबद्दल युवा सेना शहरप्रमुख जयेश संजय विसावे, डॉ. श्रीनाथ प्रकाश परब, उद्योजक स्वप्नील विष्णू नानचे आणि मितेश मिलिंद केदारे यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मान केला.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सईच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. भविष्यात सईने आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी सईचे कुटुंबीय, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

