4kNews कामोठे
पनवेल, दि. 25(प्रतिनिधी) : सोन्याच्या सहा लगडींचा अपहार करून फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीकडून ६६६.२३ ग्रॅम वजनाचे, सुमारे ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले.

पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने या सोन्याचा अपहार केल्याची तक्रार मिळाल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पथके तयार केली. पोलिसांनी पनवेल शहर व रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी कुरुडवाडी, सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

त्यानंतर आरोपीच्या मूळ गाव खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे शोध घेऊन शुभम खिलारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अपहार केलेल्या सहा सोन्याच्या लगडी हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहायक पोलीस आयुक्त मधुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, अभिजीत अभंग तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

