4kNews कामोठे दि. 8
नवी मुंबई (प्रतिनिधी) : अंडकोशात अचानक तीव्र वेदना, सूज आणि उलट्यांचा त्रास झालेल्या २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या वृषणाला पिळ बसून रक्तपुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे निदान झाले. मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथे तातडीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे वृषणाचा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले.

गोपनीयतेसाठी ‘अमेय’ असे नाव दिलेल्या या तरुणाला डाव्या अंडकोशात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉप्लर तपासणीत डाव्या वृषणाला रक्तपुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर युरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रक्रियेदरम्यान वळलेले वृषण पूर्ववत केल्यानंतर रक्तपुरवठा पुन्हा सुरू झाल्याचे आढळले. भविष्यात पुन्हा पिळ बसू नये यासाठी दोन्ही वृषणांना सुरक्षित करण्यासाठी ‘बिलॅटरल ऑर्किडोपेक्सी’ करण्यात आली. सुमारे २० मिनिटांची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, रुग्णाला दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले. डिस्चार्जपूर्वीच्या डॉप्लर तपासणीत वृषणाला रक्तपुरवठा सुरळीत असल्याचे दिसून आले.

डॉ. विकास भिसे यांनी सांगितले की, वृषणाला पिळ बसणे ही तातडीची वैद्यकीय स्थिती असून, अचानक अंडकोशात तीव्र वेदना, सूज, मळमळ किंवा उलट्या अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. पहिल्या काही तासांत उपचार मिळाल्यास वृषणाला होणारे कायमस्वरूपी नुकसान टाळण्याची शक्यता अधिक असते.

