4kNews कामोठे दि. 8
पनवेल (हरेश साठे) : गोरगरिबांचे आधारस्तंभ, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहा दशकांहून अधिक काळाच्या सेवाभावी व कर्तृत्ववान जीवनप्रवासाचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ गौरव करण्यात आला. समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती, रोजगार आणि सार्वजनिक जीवनातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि प्रतिभाताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रामशेठ ठाकूर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, पूनम ठाकूर, रत्नप्रभा घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजारामबुवा शेलार, उपाध्यक्ष भावना घाणेकर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘कमवा आणि शिका’च्या संस्कारातून रामशेठ ठाकूर घडले : शरद पवार
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतून रामशेठ ठाकूर घडले असून, रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार खासदार शरद पवार यांनी काढले. कर्मवीरांचा जनसेवा व शिक्षणसेवेचा वारसा रामशेठ ठाकूर यांनी पुढे नेला आहे. रयत शिक्षण संस्थेला त्यांचे सातत्यपूर्ण पाठबळ लाभले असून, संस्थेच्या प्रगतीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही पवार यांनी सांगितले.

रामशेठ ठाकूर यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत व्यवसाय, समाजकारण, शिक्षण आणि राजकारणात आपले स्थान निर्माण केले. भूमिपुत्रांच्या हक्कांसाठीच्या विविध आंदोलनांत सहभाग घेतल्यानंतर त्यांनी दोन वेळा खासदार म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारणाला प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला, संस्कृती व सामाजिक मदतीच्या क्षेत्रात कार्य सुरू ठेवले.

रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक सुविधांसाठी त्यांनी १३५ कोटी रुपयांहून अधिक मदत केली आहे. तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी, गरजू कुटुंबे, क्रीडापटू आणि कलाकारांना विविध प्रकारचे सहकार्य केले जात आहे. त्यांच्या संघर्ष, कर्तृत्व, नेतृत्व आणि समाजसेवेच्या प्रवासाचा गौरव या पुरस्काराने झाला आहे.

