4kNews कामोठे
पनवेल, दि. 8 (वार्ताहर) : कामोठे व कळंबोली परिसरातील अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, खराब रस्ते तसेच कचऱ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक रत्नाकर प्रभू व बापू इथापे यांनी पनवेल महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या लीना गरड यांना लेखी निवेदन दिले.

परिसरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यानेही नागरिक त्रस्त आहेत. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण उपस्थित होते.

