4kNews कामोठे दि. 18
नवी मुंबई / पनवेल (प्रतिनिधी) भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (AERA) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला (Variable Tariff Plan) मंजुरी दिल्याने, या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी गती मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता “मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग” ऐवजी “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन मार्ग” अशी बदलण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात भरीव सवलतींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १००% पूर्ण सूट मिळणार आहे. ५,००० किमी पर्यंतचे कमी अंतराचे (Short-haul) मार्ग दुसऱ्या वर्षी ५०% सवलत मिळणार आहे.

५,००० किमी पेक्षा जास्त लांब पल्ल्याचे (Long-haul) मार्ग दुसऱ्या वर्षी ५०% आणि तिसऱ्या वर्षी २५% सवलत मिळणार आहे. अतिरिक्त आंतरराष्ट्रीय फेऱ्या अस्तित्वात असलेल्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास ७५% पर्यंत सवलत मिळणार आहे, आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा पहिल्या वर्षी ९०% आणि दुसऱ्या वर्षी ५०% सवलत दिली जाणार आहे. विमान कंपन्यांसाठी: हे सुधारित निकष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहू उड्डाणे सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी अधिक आकर्षक बनवतील. यामुळे नवीन हवाई मार्गांचा जलद विकास होईल आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होणार आहे. अधिक विमान कंपन्यांचा सहभाग आणि थेट आंतरराष्ट्रीय मार्गांमुळे प्रवाशांना अधिक पर्यायी गंतव्यस्थाने, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि स्वस्त तिकीट दर (किफायतशीर दर) उपलब्ध होतील.

मालवाहू वाहतूक (कार्गो): मालवाहू विमानांसाठी दिलेल्या सवलतींमुळे या भागातील एअर कार्गो कनेक्टिव्हिटीच्या वाढीस मोठा पाठिंबा मिळेल. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि सिडको यांच्यातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुरुवातीच्या वार्षिक २ कोटी (२० दशलक्ष) प्रवासी क्षमतेवरून पूर्ण विकासानंतर ९ कोटी (९० दशलक्ष) प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन कार्गो हाताळणी क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे

