4kNews कामोठे दि. 31
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत आगामी पक्षकार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पक्षसंघटना अधिक सक्षम करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी राजकीय आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यपद्धती विकसित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क दृढ करणे आणि पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, या अनुषंगाने बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळातील पक्षकार्याची दिशा निश्चित करताना जिल्हानिहाय संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अजय जामवाल, सहसंघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, ठाणे-कोकण विभागीय संयोजक आमदार प्रमोद जठार, सहसंयोजक संजय वाघुले, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांच्यासह रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीमुळे तीनही जिल्ह्यांतील संघटनात्मक समन्वय अधिक मजबूत करण्यास आणि आगामी पक्षकार्याला नवी दिशा देण्यास मदत होणार आहे.

