आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

4kNews कामोठे  दि. 13
मुंबई : महाराष्ट्रातील आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालय परिसरात मुंडन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला शिक्षिका, शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.


आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे अनेक शिक्षकांना गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक, सामाजिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बदली प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक आणि न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.  


शिक्षकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मुंडन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम शासनासह सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्यात आला.
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी केली. राज्यातील हजारो शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top