नवीन बातम्या

बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन


4kNews कामोठे
मुंबई, दि. 12 सप्टेंबर (अजित मोहिते) : भारतातील शिक्षण क्षेत्रातील बदल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यासाठी ‘द स्कुल्स ऑफ इंडिया एज्युकेशन समिट २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान खोपोली येथील नोव्होटेल इमॅजिका येथे तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. 



देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, शाळांचे संस्थापक, प्राचार्य, धोरणकर्ते तसेच एडटेक क्षेत्रातील तंत्रज्ञान संशोधक या परिषदेत सहभागी होणार आहेत. आधुनिक अध्यापन पद्धती, अभ्यासक्रमातील नावीन्य, शालेय नेतृत्व, संस्थात्मक व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकास यावर या परिषदेत मंथन होणार आहे.
मालपाणी ग्रुपचे संचालक यशवर्धन मालपाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी स्कूल ऑफ इंडियाचे संस्थापक अंकित पुष्पराज वर्मा आणि ध्रुव स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिष्का मालपाणी उपस्थित होत्या.



परिषदेत शालेय शिक्षणात AI चा सुरक्षित व परिणामकारक वापर, जागतिक शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणातील समानता यावर विशेष चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच एडटेक कंपन्या, स्मार्ट क्लासरूम सोल्युशन्स आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.


देशातील विविध क्षेत्रांतील शिक्षणतज्ज्ञ या परिषदेला मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या विचारमंथनातून भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी भविष्योन्मुख दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेसाठी theschoolofindia.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top