4kNews कामोठे दि. 10
नवी मुंबई (प्रतिनिधी) : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने अल्फा वेव्ह ग्लोबल, प्रेमजी इन्व्हेस्ट, टेमासेक आणि ब्लॅकरॉकच्या व्यवस्थापनाखालील निधीसह देशांतर्गत व जागतिक गुंतवणूकदारांकडून ९,८२५ कोटी रुपयांचे (सुमारे एक अब्ज डॉलर) भागभांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गुंतवणूकदारांसोबत बंधनकारक करार करण्यात आले आहेत.

ही गुंतवणूक तीन टप्प्यांत होणार असून अंतिम टप्पा जुलै २०२७पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर संबंधित गुंतवणूकदारांकडे कंपनीतील सुमारे ५.५४ टक्के हिस्सा असेल. या व्यवहारामुळे कंपनीचे गुंतवणुकीपूर्वीचे मूल्य सुमारे १८ अब्ज डॉलर निश्चित झाले आहे.
उभारण्यात येणाऱ्या निधीचा वापर विमानतळांचे आधुनिकीकरण, विस्तार आणि प्रवासी हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी केला जाणार आहे. कंपनीचे उद्दिष्ट विमानतळांची एकत्रित वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे २० कोटींपर्यंत नेण्याचे आहे.

याशिवाय ‘अदानी एअरपोर्ट सिटी’अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे २२ दशलक्ष चौरस फुटांच्या मिश्र-वापर विकासाची योजना असून, ग्राउंड हँडलिंगसह बिगर-विमान वाहतूक व्यवसायांचाही विस्तार केला जाणार आहे. विमानतळांवरील प्रवासी सुविधा आणि व्यावसायिक उपक्रम वाढविण्यावरही भर राहणार आहे.
भारतामधील वाढती हवाई प्रवासाची मागणी, ग्राहकांची वाढती क्रयशक्ती आणि विमानतळ परिसरातील विकासाच्या संधी लक्षात घेता या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची संधी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

