4kNews कामोठे
पनवेल, दि. 26 (वार्ताहर) : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी गेल्या १३ वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत असून, त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समिती, पनवेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

नैना प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी, हक्क आणि भवितव्याशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि खासदार श्रीरंग बारणे यांनाही निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली. या प्रश्नांचा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याशी आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याशी संबंध असल्याने शासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी महाविकास आघाडीचे नेते व माजी आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती काशीनाथ पाटील, वामनशेठ शेळके, तालुका चिटणीस राजेश केणी, सभापती देवेंद्र मढवी, मनीषाताई चोरघे, नंदकुमार पाटील आणि शेखर शेळके आदी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात भेटी आणि बैठका घडवून आणण्यासाठी पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बाळा कुंभार आणि ढाकणे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समितीने त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार लवकरच बैठक होऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

