4k समाचार
उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )हिंदू धर्मात पितृ पक्षाला महत्वाचे स्थान आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवैद्य अर्पण केले जाते. घरावर किंवा टेरेस वर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यासाठी कावळा या पक्षाला अन्न ग्रहण करण्यासाठी बोलाविले जाते. याला अनेक ठिकाणी काव, काव असेही म्हणतात.अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याताल कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला हिंदू धर्मातील महत्त्वाचा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष ७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत आहे. या काळात कावळ्याला महत्त्व आहे. परंतु उरण परिसरातील कावळ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळेच हा विधी करताना गायीला किंवा इतर पशु पक्ष्यांना घास भरवावा लागत आहे.या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय असे विधी केले जातात.

पितृपक्षात केलेल्या तर्पणामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कायम सुख-शांती नांदते, असे मानले जाते. पूर्वजांच्या मृत्यूची जी तिथी असेल त्या तिथीला पितृपक्षात श्राद्ध केले जाते. याला महालय असे म्हणतात. ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसते किंवा त्या तिथीला महालय करणे शक्य होत नाही त्यांचा महालय सर्वपित्री अमावस्येला (भाद्रपद अमावस्या) केला जातो. पूर्ण पितृ पंधरवड्यात महालय करणे शक्य न झाल्यास पंचागात दिलेल्या महालय समाप्तीच्या कालावधीपर्यंत श्राद्ध करता येते. महालय श्राद्धाच्या माध्यमातून पूर्वजांना आजही कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याची माहिती उरण मधील धार्मिक विधी करणारे प्रसिद्ध ब्राह्मण जयेश वत्सराज यांनी दिली आहे.

पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे.धार्मिक मान्यतेनुसार श्राद्धाच्या १६ दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात. या दिवसांमध्ये पिंडदान आणि तिलांजली अर्पण करून पितरांना संतुष्ट केले जाते. पितृपक्षात पूर्वज विशेष पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे. पितृपक्षाचे १६ दिवस अयोग्य मानले जातात.या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री केली जात नाही. परंतु या समजुती चुकीच्या आहेत. याच काळात पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असल्याने खरेदी-विक्री करण्यास हरकत नाही.

पितृपक्ष आणि कावळे यांचे समीकरण, नाते रूढ आहे, ऐरवी कावळ्याला कधीही जवळ न करणारेदेखील पितृपक्षात काव…काव..करत असतात. यंदा मात्र पितृपक्ष अर्ध्या अधिक संपला, तरी कावकाव फारशी कानावर येत नसल्याचे दिसते. आपल्या पूर्वजांसाठी ठेवलेला नैवेद्य किंवा पिंडाला स्पर्श करण्यासाठीदेखील कावळा दिसत नसल्याने यंदा कावळे गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यमदूताचे प्रतीक मानले जात असलेल्या कावळ्याला पितृपक्षात विशेष महत्त्व असते. पूर्वजांचे प्रतिनिधित्व करणारा हा पक्षी ऐरवी अशुभ मानला जात असला, तरी पितृपक्षात कावळ्याला अन्न देणे हे शुभ मानले जाते, जे पितरांना तृप्त करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते, अशी धारणा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अन्य वन्यजीवांप्रमाणेच कावळ्यांची संख्याही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात कावळे दिसत असले, तरी शहरी भागातील त्यांची संख्या कमी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.पर्यावरणात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे अनेक वन्यजीव पशुपक्षी नष्ट झाले असून येऱ्या काळात अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.याबद्दल प्राणीप्रेमी व पर्यावरण प्रेमीनी चिंता व्यक्त केली आहे.

पशु पक्षी नामशेष होण्याच्या संदर्भात संदर्भात प्राणी मित्र तथा केअर ऑफ नेचरचे संस्थापक संस्थापक राजु मुंबईकर यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी सांगितले की, शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत.औद्योगीकिकरण सूरु आहे.त्यामुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.वनतोड मोठया प्रमाणात होत आहे.पर्यायी वनांची निर्मिती होत नसल्याने कावळ्यांसह अन्य पशुपक्ष्यांची निवारास्थाने नष्ट होत आहेत. त्याचबरोबर मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम पक्ष्यांवर होत असून, रेडिएशनच्या तीव्रतेचा फटका चिमण्यांइतकाच कावळ्यांनाही बसत आहे. त्यामुळे अन्य पशुपक्ष्यांप्रमाणेच कावळ्यांची संख्यादेखील झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास भविष्यात कावळ्यांची केवळ छायाचित्रेच दिसतील,आपल्याला कावळा फक्त मोबाईल, टीव्ही पुस्तक व वृत्तपत्रात दिसतील मात्र प्रत्यक्ष कावळा शोधूनही सापडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
