4k समाचार
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तक प्रदर्शनात डॉ.अब्दुल कलाम यांनी लिहिलेली आणि तसेच कलामांविषयी लिहिलेल्या पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, ‘आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य जाणून घेणे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल या उक्तीप्रमाणे तुमच्या मेंदूला चांगला वैचारिक खाद्य पुरवठा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यकाळात तुमच्या आयुष्यातील उज्वल यशाची पायाभरणी होईल.’

उद्घाटन प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयात उपलब्ध नसलेली परंतु त्यांना वाचावयास आवडणारी पुस्तके मागवून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील डॉ.झेलम झेंडे आणि प्रा. विशाखा पाटील या उपस्थित होत्या. पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी केले.दिवसभरात विविध विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रदर्शनास भेट दिली. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी ग्रंथालय विभागातील नर्मदा खरपडे व कमल बंगारे यांचे सहकार्य लाभले.
