4k समाचार
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे )सेवा सहयोग फाऊंडेशन ही संस्था गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण, पर्यावरण व महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर कार्यरत आहे. संस्थेचे सामाजिक उपक्रम हे बहुआयामी असून समाजात जागरूकता निर्माण करण्यास हातभार लावतात.अशाच उपक्रमांपैकी एक म्हणजे ‘राईड टू सेफ्टी’ — रस्ता सुरक्षा जागरूकतेसाठी राबविण्यात येणारा प्रभावी उपक्रम. या उपक्रमांतर्गत ज्या पालकांकडून आपल्या मुलांना दुचाकीवरून शाळेत आणले जाते, अशा पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वितरित केले जाते. हा उपक्रम आयसीआयसीआय लोम्बर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला गेला.

आज या उपक्रमांतर्गत फुंडे येथील तु.ह.वाजेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना व पालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, हेल्मेट वापराचे महत्त्व तसेच अपघात प्रतिबंधक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनचे कार्यकर्ते विनय बर्वे,सुषमा अवघडे, जयश्री सानप,माधवी पाटील व प्रशांत जी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तु . ह.वाजेकर विद्यालय फुंडे येथील प्राचार्य साळुंखे,उपमुख्याध्यापिका थोरात मॅडम, पर्यवेक्षिका पाटील मॅडम,पाटील एच.एन, ठाकूर एन. के,नाईक एस.डी,म्हात्रे एस.डी,पाटील पी. ए,पाटील एन.के,म्हात्रे एम.आर तसेच सेवक वर्ग या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जागरूकता निर्माण झाली असून, ‘हेल्मेट म्हणजे केवळ नियम नव्हे, तर आपल्या जीवाचे रक्षण’ — हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून दिला गेला.
