4k News कामोठे दि. 26
पनवेल (प्रतिनिधी) : धम्मचक्र प्रवर्तन सम्राट अशोक विजयादशमी द्विदशकपूर्तीनिमित्त सह्याद्री संस्था (रजि.), पनवेल यांच्या वतीने राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात अनमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या गुणगौरव सोहळ्यात श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांना मा. आतिष साळवी आणि मा. सचिन कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला पनवेलचे नगराध्यक्ष प्रीतम म्हात्रे आणि बाळू मामाशेठ फडके यांनी भेट देऊन उपस्थितांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि जलसा गीतांच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सह्याद्री संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

कलाकारांना प्रोत्साहन, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
स्पर्धेत जलसा गीत गायन सादर करणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

सह्याद्री संस्था (रजि.), पनवेलचे संस्थापक-अध्यक्ष आयु. नंदकुमार शा. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि समाजहिताच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला.

