4kNews कामोठे दि. 25
पनवेल (प्रतिनिधी) : सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत विकास परिषद, पनवेल शाखेतर्फे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा या उपक्रमांतर्गत १८ हजार फराळ बॉक्स, म्हणजेच सुमारे १४ टन दिवाळी फराळ जवानांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

२०२० मध्ये १४ हजार लाडूंपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला लोकसहभागातून मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. मागील वर्षी १६ हजार २० फराळ बॉक्सच्या माध्यमातून सुमारे ११ टन फराळ जवानांना पाठविण्यात आला होता. यंदा त्यात वाढ करून १८ हजार बॉक्स पाठविण्यात येणार आहेत.

या फराळात लाडू, चिवडा, चकली, शेव आणि शंकरपाळे या पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश आहे. फराळासोबत जवानांसाठी शुभेच्छापत्रेही पाठविण्यात येतात. भूज, बिकानेर, बाडमेर, जम्मू-काश्मीर, लेह, सियाचीन, गुवाहाटी आणि तवांग यांसारख्या भागांत तैनात असलेल्या जवानांपर्यंत हा फराळ पोहोचविला जातो.

देणगीदारांचे सहकार्य, स्वयंसेवकांचे परिश्रम आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे. सैनिक आणि समाजातील भावनिक नाते दृढ करणाऱ्या या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने ज्योती कानिटकर यांनी आभार मानले.

