4kNews कामोठे
पनवेल, दि. 25 (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये अतिक्रमणांवरील कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका मेघना घाडगे यांनी केला आहे. कातकरी व आदिवासी महिलांच्या छोट्या व्यवसायांवर कारवाई केली जाते; मात्र गॅरेज लाइन आणि जवाहर औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या काळात छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब महिलांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच मोठ्या अतिक्रमणांवरही समान निकषांनुसार कारवाई करावी, अशी मागणी घाडगे यांनी महापौर व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

याशिवाय, महापालिकेच्या कामांवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करावी, त्यांना ओळखपत्र व सुरक्षा साधने द्यावीत आणि प्रत्यक्ष मनुष्यबळाची पडताळणी केल्यानंतरच कंत्राटदारांची बिले मंजूर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व मुद्द्यांवर आयुक्तांनी सभागृहात स्पष्टीकरण देऊन ठोस निर्णय घ्यावा, असे घाडगे यांनी म्हटले आहे.

