4kNews कामोठे दि. 26
भाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष, तर सुशांत धोत्रे जिल्हा संपर्कप्रमुख; प्रशांत सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी २५ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्याचा दौरा करून विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. पेण, माणगाव, महाड आणि श्रीवर्धन येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. महाड व श्रीवर्धन येथील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक महाडच्या विश्रामगृहात झाली.

या दौऱ्यादरम्यान आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भाऊ जाधव यांची पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी, तर सुशांत धोत्रे यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रशांत सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व युथ रिपब्लिकनचे पनवेल शहराध्यक्ष प्रशांत सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पनवेल येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साईनगर येथील गणेश मंदिर, जुने पनवेल येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष सागरभाई संसारे आणि युवा नेते अनिकेत संसारे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार असून, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना साड्यांचे वाटपही करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

