4kNews कामोठे
पनवेल, दि. २५ (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कथित विलंब आणि कागदपत्रांच्या मागणीवरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका दप्तरी जन्म-मृत्यूची नोंद असतानाही दुय्यम प्रमाणित प्रत मिळविण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जन्म-मृत्यू दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही काही अर्जदारांना अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. एका प्रकरणात मृत्यूची नोंद असतानाही संबंधित व्यक्तीच्या मृत्यूबाबत सोसायटीचे पत्र सादर करण्यास सांगण्यात आल्याचा दावा अर्जदाराने केला आहे.

दरम्यान, एका अर्जदाराने दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने माहितीच्या अधिकारांतर्गत अपील दाखल केले. त्यानंतर संबंधित अर्जदाराला दाखल्याची प्रत मिळाल्याचे सांगण्यात आले. अन्य एका प्रकरणात मृत्यू दाखला गहाळ झाल्याने पोलिस ठाण्याची नोंद सादर केल्यानंतरही अतिरिक्त प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे जन्म-मृत्यू विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाले असून, आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन विभागातील कामकाज सुरळीत करावे आणि नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळतील यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

