4kNews कामोठे दि. 25
पनवेल : संस्कार प्रतिष्ठान अंतर्गत अॅड. सौ. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) संचालित स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ठाणा नाका रोड येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाला गुरुवर्या सौ. देवताताई प्रसाद सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका डॉ. प्रियांका तेजस कांडपिळे, डॉ. अस्मिता जगदीश घरत, अॅड. शिवानी सुनील घरत तसेच अॅड. प्रितीताई मनोज भुजबळ यांचीही उपस्थिती लाभली.
सरस्वती पूजन व गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गुरुजनांना मानवंदना देत शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, सुगम संगीत, तबला, पेटी, गिटार, भरतनाट्यम आणि विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

स्वरसंस्कार संगीत विद्यालयात सध्या १५० हून अधिक विद्यार्थी विविध कला शिकत असून गायन, वादन, तबला, पेटी, गिटार, भरतनाट्यम व वेस्टर्न डान्सचे नियमित वर्ग घेतले जातात. तसेच संस्कार प्रतिष्ठानतर्फे जिम्नॅस्टिक, तायक्वाँदो, योग, अॅबॅकस व चित्रकला यांसारखे उपक्रमही राबविले जातात.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि कलाविष्कारामुळे कार्यक्रमाचे वातावरण भावपूर्ण झाले.

“संगीत आणि संस्कारांची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणे, हेच स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचे ध्येय आहे,” असे संचालिका अॅड. सौ. सुरेखा प्रशांत भुजबळ यांनी सांगितले.

