उरण, दि. १९ (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील रिटघर गावाने गेल्या ५२ वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा अखंडपणे जपली आहे. १९७४ मध्ये सुरू झालेली ही परंपरा आजही गावकऱ्यांच्या एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.

सुमारे २१०० लोकसंख्या आणि ४०० उंबरठे असलेल्या रिटघर गावात प्रत्येक घरात स्वतंत्र गणपतीची स्थापना न करता जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हनुमान मंदिरात सामूहिक गणेशस्थापना केली जाते. या उपक्रमामुळे गावातील एकोपा, स्नेह आणि बंधुभाव दृढ होण्यास मदत होत असून अनावश्यक खर्चालाही आळा बसतो.

गावातील तरुण मंडळी स्वतः पर्यावरणपूरक सजावट, आरास आणि चलचित्रांचे देखावे तयार करतात. गणेशोत्सव काळात भजन, कीर्तन, काकड आरती, हरिपाठ, पारायण तसेच विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सवाबरोबरच गौरी उत्सव, नवरात्रोत्सव आणि गोपाळकाला यांसारखे सणही ग्रामस्थ एकत्रितपणे साजरे करतात..

राजकीय मतभेद बाजूला ठेवून आबालवृद्ध, महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. २०२४ मध्ये जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘विघ्नहर्ता पुरस्कार’ मिळाल्याचेही सांगण्यात आले.
एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची ही परंपरा केवळ रिटघरपुरती मर्यादित न राहता इतर गावांसाठीही सामाजिक ऐक्य आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श ठरत आहे, अशी माहिती माजी सरपंच भारत भोपी यांनी दिली.

