4kNews कामोठे
“पक्षाने दाखविलेला विश्वास जनसेवा व संघटनबांधणीतून सार्थ ठरवू” — आदित्य घरत
उरण, दि. 15(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व कामगार नेते आदित्य यशवंत घरत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या निवडीबद्दल आदित्य घरत यांनी हर्षवर्धन सपकाळ, महेंद्रशेठ घरत तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. “उपाध्यक्षपदाची जबाबदारी ही केवळ पद नसून काँग्रेसची विचारधारा, लोकशाही मूल्ये आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी अधिक जोमाने काम करण्याची संधी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

उरण तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करणे, जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “पक्षाने दाखविलेला विश्वास जनसेवा, संघटनबांधणी आणि लोकहिताच्या कार्यातून सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन,” असेही त्यांनी सांगितले.

आदित्य घरत यांनी यापूर्वी पक्षाच्या ध्येय-धोरणांचा तळागाळात प्रचार व प्रसार करत संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या निवडीमुळे उरण तालुका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

