4kNews कामोठे
वयाच्या २३व्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रात यश; गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
उरण, दि. 23(विठ्ठल ममताबादे) : नागाव गावची कन्या कुमारी विधिता मनीष घरत हिने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. नागावची पहिली महिला डॉक्टर ठरलेल्या विधिताच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विधिता ही नागावचे सुपुत्र आणि समिधा क्रिकेट क्लबचे मालक मनीष शशिकांत घरत यांची द्वितीय कन्या आहे. मनीष घरत यांनी क्रिकेट क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे नागावला रायगड जिल्ह्यात ओळख मिळाली. आता विधिताने वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करून गावाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

विधिताचे यश गावातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर मुलीही विविध क्षेत्रांत मोठी कामगिरी करू शकतात, हे तिने सिद्ध केले आहे.
नागावचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांनी विधिताचे अभिनंदन करून तिच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. तिच्या यशाबद्दल नागाव परिसरातूनही कौतुक होत आहे.

