4kNews कामोठे दि. 16
उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यातील गव्हाण येथे बंद खाणीजवळ नोव्हेंबर २०२४ मध्ये आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी उरण पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ज्ञानेश्वर इस्टेट कंटेनर यार्डच्या मागील बाजूस असलेल्या दांडाच्या बंद खाणीजवळ ही घटना घडली होती. डोंगराच्या सुमारे ६० ते ७० फूट उंच कड्यावरून पडल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमी अवस्थेत त्याला उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी रात्री १०.५० वाजता त्याला मृत घोषित केले.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३५ वर्षे, उंची सुमारे १५७ सेंटीमीटर, शरीरयष्टी सडपातळ आणि रंग सावळा होता. त्याने फिकट पिवळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची अंतर्वस्त्रे परिधान केली होती. गळ्यात काळ्या धाग्यातील काळ्या रंगाचे लॉकेट होते. शर्टावर इंग्रजीत लाल रंगाने ‘CITY’ असे लिहिलेले होते.

या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद क्रमांक ९४/२०२४ दाखल असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्णनातील व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास उरण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

